best news portal development company in india

“भारत मला घाबरतो…” – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसूरीची उघड फुशारकी पाकिस्तानी लष्कर–लष्कर-ए-तैयबा संबंधांचा जाहीर पर्दाफाश

SHARE:

“भारत मला घाबरतो…” – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसूरीची उघड फुशारकी

पाकिस्तानी लष्कर–लष्कर-ए-तैयबा संबंधांचा जाहीर पर्दाफाश

नवी दिल्ली |

लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ नेता आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसूरी याने केलेल्या एका धक्कादायक कबुलीमुळे पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटनांमधील घनिष्ठ संबंध पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहेत. “पाकिस्तानी लष्कर मला त्यांच्या कार्यक्रमांसाठी नियमितपणे निमंत्रण पाठवते. शहीद सैनिकांच्या अंत्यविधीतील प्रार्थनेचे नेतृत्व करण्यासाठीही मला बोलावले जाते,” असा दावा कसूरीने केला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये कसूरी पाकिस्तानमधील एका शाळेतील कार्यक्रमात मुलांना संबोधित करताना बोलताना दिसतो. यावेळी त्याने उघडपणे, “भारत मला घाबरतो,” अशी फुशारकीही मारली.

हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख नेता असलेल्या कसूरीच्या या वक्तव्यामुळे दहशतवादाविरोधात कारवाई करत असल्याचे पाकिस्तान सरकारचे जागतिक स्तरावरील दावे फोल ठरले आहेत. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानी लष्कराचे प्रत्यक्ष सहकार्य असल्याचे हे विधान स्पष्टपणे दर्शवते.

यापूर्वी भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात बोलताना कसूरीने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले होते. “दहशतवादी तळांवर हल्ला करून भारताने चूक केली आहे,” असे म्हणत त्याने भारतावर टीका केली होती.

काश्मीरविषयी आपला कट्टर अजेंडा पुन्हा अधोरेखित करताना कसूरीने जाहीर केले की, “लष्कर-ए-तैयबा कधीही ‘काश्मीर मिशन’पासून माघार घेणार नाही.” एका रॅलीदरम्यान बोलताना त्याने, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून माझ्यावर आरोप झाल्यामुळे मी आता जगभर प्रसिद्ध झालो आहे, असेही वादग्रस्त वक्तव्य केले होते.

कसूरीच्या या उघड कबुल्यांमुळे पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mahasatta Times
Author: Mahasatta Times

Leave a Comment