best news portal development company in india

बार्शीच्या इतिहासात नवे पर्व विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाचा अभूतपूर्व शौर्य संचलन

SHARE:

बार्शी शहराच्या इतिहासात प्रथमच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शौर्य संचलनाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (दि. १०) शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिस्तबद्ध व घोषणांनी भारलेले हे संचलन शहरभर चर्चेचा विषय ठरले.

भगवंत मंदिर मैदान येथून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, आर.एस.एम. हायट्स, मल्लप्पा धनशेट्टी रोड, शाहिर अमर शेख चौक, पांडे चौक, नगर परिषद, नरवीर तानाजी चौक, संकेतवर उद्यान, एकवीरा चौक मार्गे पुन्हा भगवंत मंदिर येथे संचलनाची सांगता करण्यात आली.

या शौर्य संचलनात बजरंग दलचे राष्ट्रीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांच्यासह सोलापूर विभागातील जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भगवंत मंदिर ट्रस्टचे सदस्य मुकुंद कुलकर्णी व सहसंयोजक संदेश भेगडे यांनीही सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान ‘जय श्रीराम’ व ‘जय हनुमान’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. शौर्य, शिस्त आणि संघटनशक्तीचे दर्शन घडवणाऱ्या या संचलनामुळे शहरातील वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले.

येथील बजरंग दलाच्या वतीने शहरात भव्य शौर्य संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनात सुमारे ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरातून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण केले. ‘जय श्रीराम’ व ‘देश का बल बजरंग दल’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

संचलनादरम्यान स्वयंसेवकांनी शिस्त, एकतेचे दर्शन घडवले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी या संचलनाचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सहसंयोजक बापूसाहेब कदम, प्रखंड मंत्री अमर शुक्ला, सहमंत्री गोविंद शिंदे, प्रखंड संयोजक शिरीष जाधव तसेच प्रचार-प्रसार प्रमुख श्रेणीकेश भुजबळ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शौर्य संचलनामुळे तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त व संघटनभावना वाढीस लागते, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.

Mahasatta Times
Author: Mahasatta Times

Leave a Comment