बाशी हादरली! पडिक शेतात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार
अजित मस्तुद, नरेंद्र भगत व अकबर मुळाणी अटकेत — ६ दिवस पोलिस कोठडी
महासत्ता टाइम्स
बाशी तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पडिक शेतातील कच्च्या रस्त्यावर बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात सुरू असल्याचा स्फोटक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात अजित मस्तुद (वय ३६, रा. रोपळ), नरेंद्र भगत (वय ४०, रा. आनंदनगर, अक्कलूज) आणि अकबर मुलाणी(वय ४५, रा. शिक्षक कॉलनी, केज) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाशी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ७ जानेवारी रोजी दुपारी बाशी–वाणेवाडी मार्गावरील जामगाव हद्दीतील समाधान बाबर यांच्या पडिक शेतात, कच्च्या रस्त्यावर आरोपी अजित मस्तुद हा सहआरोपी नरेंद्र भगत व अकबर मुलानी यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून गर्भपात करत होता. या अमानवी कृत्याची माहिती मिळताच पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकत आरोपींना रंगेहात पकडले.
छाप्यात घटनास्थळावरून वैद्यकीय उपकरणे, साहित्य व महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून, हे कृत्य पीसीपीएनडीटी कायद्याचा थेट भंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणामुळे बाशी तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, अशा नराधमांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहे.







